शहरातील वाढत्या भाईगिरीला लगाम घालणार कोण ?

नाशिक : शहरात खुनाचे सत्र सुरूच असून जुन्या वादाची कुरापत मनात ठेवत मध्यरात्री नाशिक रोड परिसरातील रोकडोबावाडी येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळाली गावातील सुंदर नगर येथे राहणारा अरमान मुनावर शेख (वय 18) हा रात्री बारा वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत रोकडोबावाडी येथून जय भवानी रोड कडे जात होता. अरमान शेख हा अण्णा गणपती रोड कडून रोकडवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जवळ आला असता तेथील स्पीड ब्रेकर जवळ दबा धरून बसलेले हल्लेखोर आकाश तपासे, टक्या झिंग्या, रवी राठोड आकाश दिनकर, व त्यांच्या दोन साथीदारांनी शेख याच्यावर धारदार शस्त्र असलेल्या कोयत्याने हल्ला चढविला. त्यात पाठीवर व डोक्यावर वर्मी मार लागल्याने आरमान शेख हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी परिसरातील नागरिकांनी आरमान शेख यास रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सचिन चौधरी यांनी पथके तयार करत संशयीतांचा माग काढला. व पहाटेच्या सुमारास संशयित रवी राठोड, आकाश दिनकर, टक्या झिंग्या या तिघांना ताब्यात घेतले तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या हाणामारीचा राग मनात ठेवून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.

![]()











