महाराष्ट्रात पावसाची भयानक स्थिती

नाशिक: राज्यात जोरदार पावसाने कहर केला असतानाच काल संध्याकाळ पासून तुफान पावसाने नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढल्याचे चित्र आहे.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नार, पारसह अनेक नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलाय. नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु असून गोदावरी नदीसह नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गोदाकाठ खळाळला असून दुतोंड्या मारुती पुर्णपणे बुडाला आहे.त्याचबरोबर पंचवटी परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नाशिक शहरात आता पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्यात बुडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणातून 9 हजार 848 क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुतोंड्या मारुती कालपर्यंत पूर्ण दिसत होता. तसेच सकाळी त्याच्या छातीपर्यंत पाणी आलेलं होतं. पण आता दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. दुतोंड्या मारुती हा पुराचा मापदंड समजला जातो. नाशिक आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.नदीकाठी असणारी सर्व दुकानं खाली करण्यास सुरुवात झाली आहे. व्यापारी आपापल्या दुकानातील सामान घेऊन दुसरीकडे जात आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता व्यापाऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला असून,नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सूचना दिल्या असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि फिल्डवर राहून काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस म्हणजेच 28 आणि 29 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांसाठी धोका उद्भवू शकतो. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आधीच दिला आहे.कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

![]()












