भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा राजकीय वाद रंगला

नाशिक : नाशिकमध्ये मंगळवारी (7 जुलै) ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली होती. नाशिकमध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यासह काही भागात 300 मिलिमीटर पाऊस पडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रशासन हाय अलर्टवर होतं. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. तसेच शाळांनाही सु्ट्टी जाहीर करण्यात आली होती. आज जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अनेक भागांमध्ये धुवाधार पावसानं झोडपलं, मात्र नाशिकमध्ये ज्या ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता असा पाऊस कुठेही पडला नसल्याचं समोर आलं. नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये झाला असून त्र्यंबकेश्वरमध्येही चांगला पाऊस पडला. नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये पडला आहे. इगतपुरीमध्ये 200 मिमी तर त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिमी पाऊस पडला. सुरगनामध्ये 149 मिमी पाऊस पडला. या व्यतिरिक्त बहुतांश ठिकाणी कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये वर्तवण्यात आलेला पावसाचा अंदाज चुकल्यामुळे विरोधकांनी आता सरकारवर आरोपांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. नाशकातील ढगफुटीच्या इशाऱ्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकीय हेतुूतून ही ‘अफवा’ पसरवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अयोध्या येथील राम मंदिरातील कथित अपहाराच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी नाशिकच्या काळाराम मंदिरातून करण्यात आली. हे आंदोलन दडपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची खोटी अफवा पसरवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला .काँग्रेसचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होऊ नये आणि लोकांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची खोटी अफवा पसरवली. संपूर्ण राज्यात पाऊस सुरू असल्यामुळे आम्ही आंदोलनाला माफक स्वरूप दिले. मात्र, हे आंदोलन होऊ नये आणि नागरिकांनी त्यात सहभागी होऊ नये, यासाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नसतानाही ढगफुटीची अफवा पसरवण्यात आली. भाजपचे बिंग फुटू नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटे वक्तव्य केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. होय, आम्हीच पाणी वर पाठवले आणि ढगफुटी घडवून आणली, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. सपकाळ यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. राज्यातील जनता गंभीर संकटाचा सामना करत आहे. अनेक भागांत अल्पावधीत विक्रमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत आपण काय बोलतो आणि काय बोलले पाहिजे, याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही.

![]()












