लॉकरमधील 222 लोकांच्या दागिन्यांवर चोरांनी मारला हात

नाशकात एक धक्कादायक आणि चित्रपटाला लाजवेल अशी घटना घडली आहे. शहरातील गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स या शाखेतील सेफ्टी लॉकर किल्लीने उघडून तब्बल 222 लोकांचे 5 कोटींचे दागिने लंपास करण्यात आल्याने नाशिक शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. जुना गंगापूर नाका परिसर हा शहरातील मध्यवर्ती व वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी असलेल्या इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात या कंपनीचे कार्यालय आहे या कार्यालयातील सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे 222 ग्राहकांचे 13,385,53 ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाखा व्यवस्थापक चंद्रकांत मुठेकर यांनी कार्यालय उघडून नियमितपणे कामकाजाला सुरवात केली .गोल्ड लोण सर्व्हिस असोसीएट जाधव हे कंपनीत काम करत असताना संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीच्या सेप्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले यावेळी त्यांच्याकडे असलेली एक किल्ली व मॅनेजर इकणकर यांच्याकडे असलेली दुसऱ्या किल्लीने लॉकर उघडले, हे लॉकर पूर्ण रिकामे दिसल्याने ते घाबरले त्यांनी याची माहिती क्रेडिट व्यवस्थापक रणजित देशमुख यांना दिली. त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापक जयेश गुजराथी यांना माहिती दिली. त्यांनी कार्यालयात धाव घेत पाहणी केली असता लॉकर रिकामे दिसले. त्यांनी त्वरित सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला .पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही तपासले असता त्यात इमारतीमध्ये असलेल्या फायनान्स शाखेच्या बिझनेस व्यवस्थापक कार्यालयाची खिडकी उघडून मध्यरात्री तीन वाजेच्या दरम्यान दोघे अनोळखी व्यक्ती आतमध्ये आले. मुख्य कार्यालयात ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या किल्या घेऊन सेफ्टी लॉकर उघडून सोन्याचे दागिने घेऊन पोबारा करत असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे कोरोना काळात रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सेफ्टी सुटचा एका चोराकडून वापर करण्यात आल्याचे समजते त्याचबरोबर चेहऱ्यावर मास्क, डोक्यावर टोपी तर दुसऱ्या चोराने अंगात टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी, चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे . सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी लॉकरची पाहणी केली व गुगल श्वानाला पाचारण करण्यात आले, गुगलने इमारतीच्या वरच्या मजल्यावरील शाखेचे कार्यालय पिंजून काढत उघड्या खिडकीपर्यंत मार्ग दाखवला. या घटनेचा सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनकडून देण्यात आली याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


![]()











