शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुरक्षा-व्यवस्थेचे तीन तेरा

नाशिक : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात (ठक्कर बाजार) किरकोळ कारणातून हॅप्पी होली मामा… म्हणत पेट्रोलची पिशवी अंगावर फेकून लायटरद्वारे एका व्यक्तीला पेटवून देण्यात आले होते. त्यात ती व्यक्ती 60 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन मध्यवर्ती बसस्थानकात शौचालयाच्या सफाई कामगार विजय इलमचंद गेहलोत (वय 54,रा. देवळाली कॅम्प) हे शुक्रवारी (दि 21) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान सुलभ शौचालयाचे कामकाज बघण्यासाठी आले होते. यावेळी संशयित आरोपी शुभम जगताप (22 रा. नागचौक) हा तेथे आला. त्याने मागील भांडणाची कुरापत काढत काही समजण्याच्या आतच पेट्रोलने भरलेली पिशवी विजयच्या अंगावर फेकली आणि हॅपी होली मामा असे म्हणत लायटरच्या सहाय्याने पेटवून दिले. यादरम्यान विजयने आरडाओरडा करताच शुभमने पळ काढला. आजूबाजूच्या नागरिकांनी विजयच्या शरीराला लागलेली आग विझवून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. विजय गेहलोत हे बसस्थानकात साफसफाईचे कामे करत होते, स्वच्छता कर्मचारी असल्याने ते तेथील शौचालयाच्या कामकाजाची पाहाणी करायला आलेले होते. यावेळी शुभम हा तेथे आला असता त्यास विजय याने येथे तू येऊ नको, यामुळे आमची बदनामी होते… असे सांगितले त्याचाच राग मनात धरून शुभमने जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस म्हणतात. यामध्ये विजय हे 60 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान सोमवारी (दि 24) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. त्यांची मुलगी निशा गेहलोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्यामध्ये खुनाचा कलम वाढवण्यात येणार आहे. असा रचला सापळा— गुन्हे शाखेच्या पथकातील प्रदीप म्हसदे, संदीप भांड यांना शुभमचा वावर ईदगाह मैदानावर रात्री असल्याचे समजले त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती कळवली .यादरम्यान उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे,नाझीमखान पठाण आदींच्या पथकाने सापळा रचत त्याला काही तासातच गजाआड केले. त्याला हटकले का नाही — 24 तास मद्याच्या तर कधी अमली पदार्थाच्या नशेत असणाऱ्या शुभम हा बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला असलेल्या मीटरच्या खोलीमध्ये वास्तव करत होता. तो मूळचा पंचवटी परिसरातील नागचौकातील रहिवासी होता मात्र तो दिवस-रात्र बसस्थाकाच्या आवारात फिरत असताना त्याला महामंडळाच्या कुठल्याही सुरक्षा रक्षकाने, कर्मचाऱ्याने,तेथील पोलिसांनी का हटकले नाही ? त्याला वेळीच हटकले असते तर आजची दुर्देवी घटना घडली नसती या घटनेमुळे बसस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुण्यातील बसस्थानकात घडलेल्या घटनेमधून काहीच शिकणार नसू तर नागरिकांची सुरक्षा रामभरोसेच …..

![]()












