शिंदे गटाचा कॉग्रेसला दे-धक्का

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीत आग लागल्यानंतर आता फटाके फुटण्यास सुरवात झाली असून याचा मोठा धक्का कॉग्रेसला बसला आहे. कॉग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील यांनी कॉग्रेस पक्ष सोडत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. डॉ हेमलता पाटील यांची ओळख म्हणजे त्या कॉग्रेस पक्षाच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जात होत्या. 1996 मध्ये हेमलता पाटील या अपक्ष नगरसेविका झाल्या आणि त्यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना कॉग्रेस पक्षाने अचानकपणे विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. कुठलीही तयारी नसताना देखील त्यांनी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना जोरदार टक्कर दिली. यंदा मात्र महाआघाडीत कॉग्रेस पक्षाकडून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळणार म्हणून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करत नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असतानाच पक्षाने हेमलता पाटील यांना कुठलीही पूर्वसूचना न देता अथवा चर्चा न करता मध्य मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याचे जाहीर केले. यादरम्यान ठाकरे गटाने देखील परस्पर ‘एबी’ फार्म देत उमेदवाराची घोषणा केली. यामुळे डॉ हेमलता पाटील या कमालीच्या नाराज झाल्या होत्या यादरम्यान त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. माघार घेताना त्यांचे अश्रू देखील अनावर झाले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघातुन महाविकासआघाडीचा उमेदवार पडला आणि भाजपच्या देवयानी फरांदे याठिकाणी विजयी झाल्या. यादरम्यान डॉ हेमलता पाटील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असताना देखील पक्ष नेतृत्वाने त्याची दखल न घेतल्याने अखेर डॉ हेमलता पाटील यांनी कॉग्रेस पक्षाला राम-राम करत दिल्लीत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत हाती धनुष्यबाण घेतला. डॉ हेमलता पाटील यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून महिला आघाडीची मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. यादरम्यान महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये उपमहापौर पद मिळविणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या रंजना बोराडे व ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य कार्यकारिणीचे माजी सदस्य दीपक दातीर यांनी देखील शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. आगामी महापालिकेच्या निवडणुका बघता हे प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत. या प्रदवेशावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते.

![]()












