इंदिरानगर, डीजीपी नगर, वडाळा रोड भागात भरदिवसा धावतात ट्रक कंटेनर

नाशिक : आंबेडकरनगर समोरील सावता माळी कॅनॉल रस्त्याने इंदिरानगर कडे दुचाकीने प्रवास करणाऱ्या युवकाला पाठीमागून भरधाव आलेल्या अवजड ट्रकने धडक दिल्याने या धडकेत दुचाकी चालक आदित्य प्रकाश दुसाने(35,रा प्रगती सोसायटी इंदिरानगर)हा गंभीरित्या जखमी झाला होता. त्यास नागरिकांनी जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुसाने हा त्याच्या दुचाकीने टीजेपी नगर -1 मधून वडाळा गावच्या दिशेने घराकडे जात होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या अवजड ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुसानेच्या दुचाकीला पाठीमागून गणपती मंदिराजवळ जोरदार धडक दिली. या धडकेत तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला. रक्त भांबळ अवस्थेत त्यास परिसरातील रहिवाशांनी व रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांनी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना काही वेळानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दुसाने यास तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला रात्री आठ वाजेनंतर प्रवेश असल्याचे आदेश सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेने काढले आहेत मात्र आंबेडकर नगर व कलानगर येथून सर्रासपणे भरदिवसा व सायंकाळी सुद्धा अवजड वाहने कॅनॉल रोडने पुढे वडाळ्यातून रविशंकर मार्गाने जात असतात. अशी तक्रार नागरिकांनी अनेकवेळा केली आहे.या अवजड वाहनांनी आंबेडकरनगर ते कलानगर पर्यंत मोठ्या संख्येने अनेकांचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर इंदिरानगर येथील श्री प्रगती सोसायटीत राहणार्या दुसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आदित्य हा फूड कंपनीमध्ये मार्केटिंगची नोकरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घरात मोठा असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार असून तो अविवाहित होता. त्याच्या अपघाती मृत्यूने इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवक सुप्रिया खोडे, चंद्रकांत खोडे, दिपाली कुलकर्णी, अजिंक्य साने, रुपाली निकुळे यांच्याकडे तक्रार केली असून यासंदर्भात नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे

![]()












