
नाशिक : शहरातील रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेले चार मुलं अचानक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर भारतीय असलेले आणि गेल्या काही वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असलेले सुमारे 40 जण धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आले होते. या ग्रुपचा सकाळी गोदावरी नदीत स्नान करून त्यानंतर शिर्डीला जाण्याचा नियोजित कार्यक्रम होता. त्यानुसार ग्रुपमधील काही जण रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरले.गोदावरी नदीत स्नान करत असताना चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. मुलं पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. घटना लक्षात येताच स्थानिक जीवरक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे चारपैकी तिघा मुलांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. या दुर्घटनेत गोपाल गुप्ता (रा. प्रियदर्शनी चाळ, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई) या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. बुडालेल्यांपैकी गोपाळ गुप्ता हा मुलगा अर्धा तास पाण्यात होता. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धार्मिक पर्यटनासाठी नाशिकला आलेल्या या ग्रुपवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी गोदावरीत स्नान करून पुढे शिर्डीला जाण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. मात्र, रामकुंडातील या दुर्घटनेमुळे त्यांच्या आनंदाच्या प्रवासाला दुःखद वळण मिळाले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी काठावर महापालिकेने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केलेली आहे. पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना पर्यटकांना पाण्यात उतरण्यापासून रोखण्याची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर होती. मुले पाण्यात उतरत असताना महापालिकेचे सुरक्षारक्षक कुठे होते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

![]()












