राष्ट्रवादी आणि भुजबळ यांच्यातील दरी दिवसेंदिवस चालली वाढत

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीत दिवसेंदिवस दरी वाढत असून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज होते आणि त्यांनी ती नाराजी जाहीर देखील केली होती .पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी रात्री बोलावलेल्या बैठकित आणि बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमदार भेटीत देखील छगन भुजबळ गैरहजर राहिले. मात्र पक्षाने भुजबळ यांच्याबरोबर बोलणे झाले असल्याचा दावा केला असतानाच शनिवारी आणि रविवारी शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला देखील ते हजर राहणार नसल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतर राष्ट्रवादीचे हे पहिलं राज्य अधिवेशन आहे. ज्यात स्वत: अजित पवार दोन्ही दिवस नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह दिग्गज नेते सहभागी होतील.मंत्री, खासदार, आमदारांसह, पदाधिकारी अधिवेशनाला येणार आहेत. अधिवेशनात राज्यस्तरीय सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मंथन होईल. पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, तरीही पक्षनेतृत्व असो की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही. यामुळे व्यथित झालेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनीही त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला होता मात्र यादरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या बरोबर संपर्क साधला अथवा नाही. याची माहिती नसून मात्र भुजबळ आणि राष्ट्रवादी पक्षामधील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांन बरोबर पक्षाच्या इतक्या महत्वाच्या अधिवेशनाला गैरहजर राहण्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ यांची पाऊले कुणीकडे याविषयी चर्चा सुरू झाली आहे .

![]()












