मनसे,भाजपा,राष्ट्रवादीला प्रतिउत्तर

नासिक : लोकसभेच्या जागेवर सध्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे असून गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र सध्या नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीसह,भाजपा,मनसेने दावा केल्याने त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व यात नाशिकच्या जागेवर दावा सांगितल्याचा तसेच गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवल्याची चर्चा पसरली होती. त्यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अशातच गोडसे यांनी ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी शेकडो वाहने घेऊन थेट ठाणे गाठत पक्षश्रेष्ठींसमोर शक्ती प्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीसाठी आग्रही मागणी केल्याची माहिती समजते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच गोडसे यांचे समर्थक असे सर्वजण शेकडो वाहनांनी ठाणे येथे गेले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ते भेट घेणार होते. रात्री आठ वाजेची वेळ मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली होती. मात्र त्यांना विलंब झाल्याने पुलाखालील उद्यानाच्या जवळ सर्वांनी ठाण मांडले आणि शिवसेनेच्या घोषणा देतानाच नाशिकच्या जागेवर दावा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री आठ वाजता भेटीसाठी वेळ दिली असली तरी ते विलंबाने आल्याने कार्यकर्त्यांनी तेथेच ठाण मांडून त्यांना निवेदन दिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेची जागा कुणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

![]()














