देशभरात उद्यापासून जीएसटीचे नवी कररचना

नाशिक : देशभरात जीएसटीची नवी कर रचना लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीची नवी कररचना लागू होणार असल्याची माहिती दिली. देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत ऐतिहासिक बदल घडवणारी ‘वस्तू आणि सेवा कर (GST) २.०’ सुधारणा उद्या, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. नवीन तरतुदींनुसार, आता फक्त दोन मुख्य जीएसटी दर असतील ५ टक्के आणि १८ टक्के. या बदलामुळे अनेक दैनंदिन गरजांच्या वस्तू आणि गृहपयोगी उपकरणे स्वस्त होणार आहेत.या सुधारणांचा सर्वात मोठा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. या वस्तू होणार स्वस्त……….. सध्या १२ टक्के दराने कर आकारला जाणारी टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, बिस्किटे, स्नॅक्स, ज्यूस, तूप आणि लोणी यांसारखी पॅकेज्ड उत्पादने आता ५ टक्के दराच्या स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक बचतीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, सायकली, स्टेशनरी वस्तू, परवडणारे कपडे आणि पादत्राणे देखील स्वस्त होणार आहेत.वाहन आणि गृहनिर्माण क्षेत्रालाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. १२०० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या छोट्या गाड्यांवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर आकारला जाईल. त्यामुळे मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांना फायदा होईल. दुचाकी वाहने देखील स्वस्त होणार आहेत. सध्या २८ टक्के दराने कर आकारला जाणारी एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर आणि मोठ्या स्क्रीनचे टीव्ही यांसारखी घरगुती उपकरणे आता १८ टक्के स्लॅबमध्ये आल्याने ती ७-८ टक्क्यांनी स्वस्त होतील. सिमेंटवरील जीएसटी कमी झाल्यामुळे बांधकाम आणि गृहनिर्माणालाही चालना मिळेल.
या वस्तू महाग होणार…….
जीएसटी २.० लागू झाल्यामुळे सर्व काही स्वस्त होणार नाही. तंबाखू उत्पादने, अल्कोहोल, पान मसाला, ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्म यांसारख्या ‘वर विशेष ४० टक्के कर स्लॅब लागू होईल. यामुळे या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलला अद्याप जीएसटीच्या कक्षेत आणले नसल्याने इंधनाच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही. हिरे आणि मौल्यवान दगडांसारख्या लक्झरी वस्तूंवरही जास्त कर आकारला जाईल. पंतप्रधान यांचा नारा……पंतपधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा देखील नारा दिलाय. स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय. स्वदेशी वस्तूंचा गर्व बाळगण्याचा सल्ला देखील मोदींनी दिलाय.

![]()












