लष्करी जवानांनी केला पाठलाग….

नाशिक: शहरात आता बिबट्याची दहशत पसरली असून काल रात्री आटलरी सेंटर येथे धक्कादायक घटना घडली असून दोन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडनेरदुमाला गावाच्या मुख्य चौकात तोफखाना केंद्राच्या जवळ आतील बाजूने लष्करी जवानांचे घरे आहेत. याच ठिकाणी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन वर्षांचा श्रुतिक गंगाधर हा अंगणात खेळत होता. परिसरात झाडीझुडपांचे जंगल आहे. याच जंगलातून बिबट्या अचानक आला. आणि या चिमुकल्याला बिबट्याने जबड्यात धरून धूम ठोकली. रडण्याचा आवाज येताच पित्याने बाहेर धाव घेतली असता बिबट्या वेगाने पळत नदीकडे जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. यावेळी आजूबाजूला असलेल्या लष्करी जवानांनी आरडाओरडा करत धाव घेतली. सुमारे शंभर मीटरपर्यंत पित्यासह सहकारी धावत सुटले मात्र बिबट्या वाऱ्याच्या वेगाने पसार झाला. यादरम्यान वनविभागाच्या 25 वनकर्मचाऱ्यांसह आटी सेंटरच्या सुमारे दीडशेहूनअधिक जवानांकडून मुलाच्या शोधमोहिमेत सहभाग घेण्यात आला होता. मात्र मध्यरात्री पर्यंत बेपत्ता चिमुकल्याचा शोध लागू शकला नाही. आपल्या चिमुकल्याला बिबट्याने नेल्याचे समजताच आईला जबर धक्का बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

![]()












