नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर

नाशिक : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नाशिकच्या राजकारणात अनेक घडामोडी बघायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात दोन विवाह सोहळ्याचे कार्यक्रम होते यामध्ये पुतण्याच्या लग्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर विलास शिंदे यांच्या लग्नासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यादरम्यान सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावत शिंदे हे शिंदेंकडेच येणार ? असे सूचक विधान केल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेत यामुळे मोठे वादळ उठले आणि यामध्ये सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. तर दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर आज शुक्रवारी प्रथमच नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते यामध्ये दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, सुनील बागुल ,माजी आमदार वसंत गिते, उप महानगर प्रमुख बाळा दराडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या भेटीदरम्यान महानगरप्रमुख विलास शिंदे हे यावेळी उपस्थित नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी विलास शिंदे यांच्यासह अनेक नेते नाराज असल्याचे विधान केले होते. मात्र कौटुंबिक कारणामुळे ते मातोश्रीवर येऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेला अजून काही धक्के बसण्याची शक्यता राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

![]()















