रात्रीतून देवळालीगाव,सातपूर परिसरात गावगुंडांनी फोडल्या कारच्या काचा

नाशिक : शहरात आता कोयता गॅंग नंतर सामान्य नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचे काम गावगुंडांनी सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणाऱ्या या तीनपट भाईंना काय कळणार की सामान्य व्यक्ती आपल्या आयुष्याची पुंजी लावून कष्ट करून आपल्या मुलांचे-मुलींचे स्वप्न असणारी कार घेत असतो. पोटाला चिमटा घेऊन त्या वाहनांचे हप्ते भरत असतो. हे त्या फुकट्याना कसे कळणार, फुकटची दारू ठोसायची आणि नागरिकांमध्ये आपल्या भाईगिरीची दहशत निर्माण करण्यासाठी गरीब सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडायच्या हे उदयोग शहरात जोरात सुरू आहेत. शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या श्रमिक नगर परिसरात सात ते आठ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर देवळालीगाव मालधक्का रोड वर देखील मध्यरात्री अज्ञात समाजकटकांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला रात्री दीड वाजेच्या सुमारास लाईट गेल्याचा गैरफायदा घेत हे कृत्य करण्यात आले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेलाच हे गावगुंड ठेंगा दाखवत असून या हल्लेखोरांना ना कायद्याचा धाक ना पोलिसांची भीती राहील असून शहरात दिवसेंदिवस या घटना वाढत असल्याने पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ पाहत आहेत मात्र यामुळे सामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. पोलिसांनी दोघा ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून संशयितांचा शोध सुरू असल्याचे समजते.

![]()















