युनिट एकच्या पथकाने पकडले रंगेहाथ

नाशिक : पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेला पुण्यावरून सांगली कारागृहात नेत असताना एका ढाब्यावरती पोलिसांनी मटण पार्टी केल्याची घटना ताजी असतानाच नाशिक शहरात देखील असाच प्रकार घडला असून शहर पोलीस मुख्यालयातील कैदी पार्टीच्या कर्तव्यावर असलेल्या चौघा पोलीस अंमलदारांनी दोन आरोपींसोबत उपनगरजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पार्टी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या दोघा संशयितांना न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातुन कैदी पार्टीच्या पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा व सत्र न्यायालय गाठले. त्यानंतर कामकाज पूर्ण झाल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी बेड्या ठोकत संशयितांना पोलीस वाहनातून नाशिकरोड कारागृहाच्या दिशेने प्रवास सुरु केला. यादरम्यान उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन थांबवत पोलिसांनी कैद्यांसोबत हॉटेल गाठत पार्टी सुरू केली.ही घटना पुणे रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये घडली. यावेळी वर्दीत असणारे पोलीस हे चक्क बेड्या ठोकलेल्या आरोपींना घेऊन एका हॉटेलमध्ये जेवण करताना एका नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्या नागरिकाने ही बाब थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाला घटनास्थळी पाठवले. युनिट एकच्या पथकाने संबंधित हॉटेलवर छापा टाकून चौघा पोलिसांना आरोपींसोबत जेवताना रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व पोलिसांची चौकशी केली आहे. आरोपींसोबत सहवास ठेवणे आणि पार्टी करणे हा गंभीर नियमभंग मानला जातो. प्राथमिक तपासात दोषी आढळलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.राज्यात कायद्याचे रक्षक,सामान्यांना न्याय मिळवून देणारे पोलिसच गुन्हेगारांसोबत पार्टी करणार असतील तर सामान्य नागरिकांना न्यायासाठी बघायचे तरी कोणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.

![]()















