गोवर्धन गावात टोळक्याचा धुडगूस

नाशिक : तालुक्यातील गोवर्धन गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांवर गुंडांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून त्यांनी मारेकऱ्यांच्या हातातील पिस्तुलला धक्का दिल्याने गोळी हवेत सुटली अन्यथा अनर्थ घडला असता अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे. किशोर पिराजी जाधव (52, रा राजवाडा) यांनी दिलेल्या फ्रियादीवरून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोवर्धन गावातील राजीव गांधीनगरातील संपर्क कार्यालयासमोर बसलेले असताना संशयित मारेकरी रोशन दिलीप जाधव, तुषार विठ्ठल कापसे, गौरव उर्फ बाळा जयराम माडे, राहुल दिलीप जाधव, अजय मनोज कापसे (सर्व रा. गोवर्धन) हे टोळके हातात तलवार, पिस्तुल, दांडके, घेऊन शिवीगाळ करत आले. यादरम्यान या संशयितांनी किशोर जाधव यांच्याजवळ जात मागील भांडणाची कुरापत काढत वाद घालण्यास सुरवात केली. रोशन याने त्याच्याजवळ असलेले गावठी पिस्तुल काढून फ्रियादी जाधव यांच्या दिशेने रोखले. आमच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी काही लोकांना तू पाठवतो काय ? थांब तुला मारूनच टाकतो, असे म्हणत रोशनने पिस्तूलातुन गोळी झाडण्यासाठी ट्रीगर दाबण्याचा तयारीत असतानाच किशोर यांनी पिस्तूलला खालील बाजूने धक्का दिल्याने त्यामुळे पिस्तूलातील गोळीचा हवेत बार होऊन मोठा आवाज झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये 11 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत याघटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

![]()












