आठ कोटींचे टीडीआर फसवणूक प्रकरण, न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

नाशिक : मिळकतीचे खोटे बनावट दस्तऐवज तयार करून त्यावर वारसदारांचे खोटे अंगठे, सह्या करून तब्बल आठ कोटींच्या टीडीआर फसवणूकप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली या सुनावणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ यु. जे. मोरे यांनी तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने या प्रकरणात आता संशयीतांना अटक केली जाऊ शकते. नाशिक शिवारातील सर्व्हे क्र 274/1अ/2 मधील वडिलोपार्जित मिळकतीबाबत फिर्यादी कल्पना निवृत्ती गोंदके यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार मागीलवर्षी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीतांनी या मिळकती मधून रस्त्यात जाणाऱ्या क्षेत्राच्या मोबदल्यात बनावट दस्तावेज तयार करून टीडीआर प्राप्त करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या नावे प्रस्ताव सादर केला मात्र त्यासाठी त्यावर त्यांच्या आई व भावांच्या खोट्या सह्या व अंगठे घेतले. कल्पना गोंदके या वारसदार असतानाही ती बाब दडवून ठेवण्यात आली महापालिकेच्या नगररचना विभागानेही याबाबत पडताळणी न करता रद्द केलेल्या जनरल मुक्तार पत्राचे आधारे नोंदणीकृत करून टीडीआर चे प्रमाणपत्र मिळविले आणि ते खुल्या बाजारात विक्री करून 8 कोटींची फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी मुख्य संशयित राजेश दत्तात्रय साळुंखे, वीरेंद्र नारायण वानखेडे, संजय दत्तात्रय साळुंखे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावत टीडीआर चा हा मोठा घोटाळा असून यामध्ये महापालिका व महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे का ? याबाबत ही शोध घ्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. अशी माहिती कल्पना गोंदके यांच्या वतीने युक्तिवाद करणारे अँड विवेकानंद जगदाळे यांनी दिली. सरकार पक्षाकडून अँड रवींद्र निकम यांनी बाजू मांडली या प्रकरणात शासकीय लोकसेवकांच्या सहभागाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कागदपत्रे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून त्यानुसार पोलिसांकडून तपासाला दिशा दिली जात आहे गुन्ह्यात आणखी कोणी सह आरोपी आहेत का ? याचाही शोध पोलीस घेत आहेत असे निकम यांनी यावेळी युक्तीवादात सांगितले. यामुळे आता या प्रकरणात गुंतलेल्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सरकारवाडा पोलिसांकडून आता कशाप्रकारे तपास केला जातो याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

![]()












