मतांचा वाढलेला टक्का ठरवणार आमदार कोण ?

नाशिक : मंदिरांची कुंभनगरी म्हणून नाशिकची खरी ओळख आहे. ही ओळख ज्या परिसरामुळे जगभर झाली तो पंचवटी परिसर गोदाकाठी वसलेला आहे तोच मतदारसंघ म्हणजे पूर्व नाशिक मतदारसंघ होय.या मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी देत पुन्हा एकदा संधी दिली तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षात असणारे गणेश गीते यांनी बंडखोरी करत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता थेट लढत ढिकले विरुद्ध गीते यांच्यात झाल्याचे चित्र आहे .उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पूर्व मतदारसंघात पैसे वाटपाच्या प्रकरणातून ढिकले आणि गीते समर्थक आमने-सामने येत दोनदा राडे झाले. यादरम्यान भाजपने गीते समर्थक पैसे वाटत असल्याचा आरोप केला तर भाजप समर्थकांनी गाड्या फोडल्याचा आरोप गीते समर्थकांनी केल्यामुळे हा मतदारसंघ हिटलिस्टवर आला. या मतदारसंघात पंचवटी गावठाणसह नाशिकरोड, मखामलाबाद, म्हसरुळ,बोरगड हा भाग येतो नाशिक पूर्व मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदान मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात ढिकले व गीते यांच्याबरोबर मनसेचे प्रसाद सानप, स्वराज्य पक्षाचे करण गायकर यांच्यासह 13 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात अंतिम आकडेवारीत 7 टक्के इतके मतदान वाढले असून गेल्यावेळी 50 टक्के मतदान असताना यावेळी 57 टक्के मतदान झाले त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा कोणाला फायदा होणार हे उद्या मतमोजणीत समजेलच मात्र विजयी होणारा उमेदवार हा कमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या निवडणुकीत लाडकी बहिणीबरोबर जरांगे फॅक्टर देखील चर्चेत असल्याचे बोलले जात आहे त्याचबरोबर या भागात असलेल्या शेतकऱ्यांचे मुद्दे देखील चर्चेत होते त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खास सभा आडगाव येथे झाली होती.या सभेचा कितपत परिणाम झाला किंवा नाही ते उमेदवारांच्या विजयानंतर कळेल. या आधीच्या निवडणूकीत काय झाले होते ? शहरातील तीन मतदारसंघापैकी विस्ताराने मोठा असणारा नाशिक पूर्व मतदारसंघ असून भाजप-शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या या मतदारसंघात सर्वात पहिले मनसेने आपला झेंडा फडकावला होता.स्व. उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवित ४७ हजार ९२४ मते प्राप्त करून विजय संपादित केला होता. 2014 मध्ये मोदी लाट उसळल्याने ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. आणि उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप तब्बल 78 हजार 554 मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे चंद्रकांत लवटे दुसऱ्या तर काँग्रेसचे उद्धव निमसे तिसऱ्या स्थानी होते. मनसेचे उमेदवार रमेश धोंगडे यांना अवघी 12 हजार 437 मतं मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत स्व.उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र भाजपचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अॅड. राहुल ढिकले यांना 85 हजार 232 मते मिळाली, तर बाळासाहेब सानप यांना 74 हजार 304 मते मिळाली होती.


![]()












