देवळालीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ

नाशिक : नाशिक मतदारसंघातील देवळाली मतदारसंघ महायुतीतील मित्र पक्षांच्या भूमिकेमुळे चर्चेत आला अत्यंत नाट्यमय घडामोडी या मतदारसंघात घडल्या होत्या. सुरवातीच्या काळात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना उमेदवारी घोषित केली मात्र इकडे महाविकास आघाडीकडे निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या मोठी होती .हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटेल असे वाटल्याने योगेश घोलप यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेला सूटत माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर या मतदारसंघात दोघांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट असतानाच या ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेची नाट्यमय रित्या एन्ट्री झाली. अर्ज भरणाच्याच्या शेवटच्या काही तासात हेलिकॉप्टरने मुंबई येथून शिंदे गटाच्या शिवसेनेचे एबी आला आणि डॉ जयश्री अहिरराव यांना शिंदे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार घोषित करण्यात आले मात्र यापुढे देखील नाट्यमय घडामोडी घडत गेल्या अर्ज मघारींच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाकडून माघारीचे आदेश असताना देखील उमेदवार जयश्री अहिरराव या नॉट-रीचेबल होत्या. त्या उपस्थित नसल्याने अखेर शिंदे गटाच्या सचिवाने आपल्या पत्रावर माघारी लिहत व सही करत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांपुढे पत्र सादर केले मात्र त्यावर उमेदवाराची सही नसल्याने निवडणूक आयोगाने ते पत्र अमान्य करत कागदोपत्री जयश्री अहिरराव व धनुष्य-बाण हे चिन्ह कायम राहिले आणि त्या देवळाली मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून कायम राहिल्याने ही लढत अजित पवार गटाच्या सरोज आहिरे, ठाकरे गटाचे उमेदवार योगेश घोलप आणि शिंदे गटाच्या जयश्री अहिरराव यांच्यात चुरशीची ठरली.या मतदारसंघात 9 टक्के इतके जास्त मतदान झाले त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीत कोणाचे पारडे जड होणार यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. त्याचबरोबर माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे गटाचा राजीनामा देत आपली संपूर्ण ताकद मुलगा योगेश घोलप यांच्यामागे उभी केली. त्याचबरोबर या मतदारसंघात लाडकी बहीण कोणाच्या मागे उभी राहते हे देखील पहाणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मनसेच्या मोहिनी जाधव व वंचित बहुजन आघाडीचे अविनाश शिंदे यांची देखील कामे असल्याने नेमकं या मतदारसंघात काय घडणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.


![]()











