गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा पॅटर्न आता बंद

नाशिक : अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” या चित्रपटाने प्रेरित होऊन काही उमेदवार अनामत रक्कम म्हणून नोटांऐवजी चिल्लर आणत असल्याने ती चिल्लर मोजता-मोजता प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकी-नऊ येत होते हे बघता निवडणूक आयोगाकडून यावर निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाला हायसे वाटले आहे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या चित्रपटात निवडणूक लढवण्यासाठी हजारो रुपये चिल्लरच्या स्वरूपात अनामत रक्कम म्हणून देण्याचा प्रसंग दाखविण्यात आला होता, हा प्रसंग असला तरी या पार्श्वभूमीवर काही इच्छुकांनी त्याचे अनुकरणही केले. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटतो. एक एक रुपया मोजताना, वेळ जातो तो वेगळा. मुख्य म्हणजे इच्छुक उमेदवार हे सर्व प्रसिध्दी मिळवण्यासाठी करत असतात मात्र यामुळे अधिकाऱ्यांचे हाल होतात. त्यालाच अनुसरून शासनाने काढलेल्या नियमावलीत उमेदवाराने केवळ हजार रुपयांचीच चिल्लर आणल्यास त्याची स्वीकृती केली जाईल, इतर रक्कम त्याला ठोस स्वरूपात भरावी लागेल असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाला हा त्रास सहन करावा लागणार नाही, लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठीही हेच नियम कायम राहणार आहेत.

![]()












