महाविकास आघाडीला मोठा दिलासा

नाशिक : आज आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या बाबतीत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आल्याने महाविकास आघाडीला आपच्या भूमिकेमुळे दिलासा मिळाला आहे . हरियाणात हाता-तोंडाशी आलेला घास कॉग्रेसला गमवावा लागल्याने इंडिया आघाडी आता महाराष्ट्र व झारखंडच्या विधानसभेच्या निवडणुकीत सावध पाऊले टाकत असून त्याचाच एक भाग म्हणजे आम आदमी पार्टीने महाराष्ट्र व झारखंड येथील विधानसभेची निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे . मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टी दोन्ही राज्यात इंडिया आघाडी म्हणजेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पाठींबा देण्याची शक्यता आहे. आम आदमीच्या या खेळीमुळे महाआघाडीला फायदा तर महायुतीला फटका बसू शकतो.काही राज्यांमध्ये आप ने निवडणूक लढवली होती मात्र मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून दिल्लीतील विधानसभेत पुन्हा आपची सत्ता आणण्यासाठी अरविंद केजरीवाल पूर्ण जोर लावणार आहेत.

![]()











