मा आ वसंत गिते उद्यापासून मध्य मतदारसंघात करणार प्रभागनिहाय दौरा

नाशिक : लोकसभा निवडणुकांनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेचे जोरदार वारे वाहू लागले असून यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. पक्षांच्या नेत्यांचे दौरे, सभा, रथ यात्रा सुरू झाल्या आहेत .लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे निवडून आल्याने आगामी विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताह सुरू करण्यात आला होता. यामध्ये नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर तर नाशिक मध्य मधून माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी द्यावी असा ठराव स्थानिक पातळीवर एकमताने घेण्यात आला. यामुळे महाआघाडीत बिगाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना याबाबत आक्रमक असताना दुसरीकडे कॉग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील नाराजी व्यक्त करत यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाकडून नाशिक मध्य आणि पश्चिमच्या उमेदवारांची नावे एकमताने ठरवण्यात आल्याने त्यांना शुभेच्छा असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या पवार गटाने लगावला असून दुसरीकडे नाशिक मध्यची जागा कोणत्याही परिस्थितीत कॉग्रेसलाच सुटली पाहिजे असा ठराव कॉग्रेसच्या बैठकीत करण्यात आल्याचे समजते .नाशिक मध्य मधून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार नितीन भोसले हे इच्छुक असून मागील वेळी त्यांनी मध्य मतदार संघातून निवडणूक लढवली होती.त्यांनी शिवसेनेच्या परस्पर घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाकडून मध्य मतदारसंघासाठी माजी नगरसेवक गजानन शेलार यांचे देखील नाव चर्चेत आहे. तर पश्चिम मतदारसंघातुन शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक नाना महाले यांनी दावा ठोकला आहे. तर कॉग्रेसच्या वतीने माजी नगरसेविका हेमलता पाटील या इच्छुक असून मागील वेळी मध्य मतदारसंघात त्यांनी विरोधी उमेदवाराला जोरदार ठक्कर दिली होती. महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी गर्दी होताना दिसत असून एक-एका मतदारसंघात तीन-तीन उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून येते. शिवाय या सर्व उमेदवारांची आप-आपली ताकद मतदारसंघात चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारी नेमकी द्यावी तरी कोणाला याबाबत डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून नेमका मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरही रस्सीखेच होणार आहे तत्पूर्वी उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार वसंत गिते यांनी सोमवारपासून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात स्नेह भेटीगाठी प्रभागनिहाय दौरा आयोजित केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वाढली असून अशा वेळी बंडखोरी रोखण्याचे तगडे आव्हान महाविकास आघाडी समोर उभे ठाकण्याची शक्यता राजकिय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

![]()











