
नाशिक : एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबरोबर तपोवन परिसरात विकासकामांची जोरदार रेलचेल सुरू असतानाच दुसरीकडे आज सकाळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील केवडी बन परिसरात असलेल्या कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत अत्यंत क्रूरपणे भरून ठेवलेला दुर्गंधीयुक्त मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी 8.30 वाजता या परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अचानक तीव्र दुर्गंधी जाणवली. त्यामुळे त्यांनी शोध घेतला असताना त्यांना एक संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली. ती उघडून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला कारण त्यात एका महिलेचे मृतदेह होतं. त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नाशिक पोलिसांना दिली. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. हा मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली जात असून फॉरेन्सिक टीम कडून तपास केला जात आहे. पोलिसांना प्रथमदर्शनी असा अंदाज आहे की, चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या करुन त्या महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये या परिसरात फेकण्यात आला आहे. पंचवटी पोलीस या हत्येचा तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे नाशिकमध्ये कुंभ सिंहस्थाच्या कामांमुळे सध्या तपोवन परिसरात मजुरांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ गेल्या अनेक महिन्यांपासून पाहिला मिळत आहे. अशा गजबजलेल्या भागात सुटकेसमध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यू कधी झाला, हे शोधण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच पोलीस याबद्दल सांगणार आहे. तसंच या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील आणि जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत.

![]()












