छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून भेटीगाठींवर भर, कार्यक्रमांना उपस्थिती….

नाशिक : लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन महिना होत आला तरी महायुतीचा उमेदवार घोषित होत नसल्याने नाशिकच्या जागेचा संभ्रम वाढला आहे की वाढवला जात आहे याबाबत राजकीय तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी घोषित करत प्रचारात आघाडी घेतली आहे. सुरवातीला शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे असणार हे निश्चित असताना विरोध झाला एक-एक नाव उमेदवारांच्या यादीत वाढू लागले.असेच नाव अजय बोरस्ते यांचे देखील आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे मुंबईला गेले होते. प्रसार माध्यमांच्या चर्चेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजय बोरस्ते यांना बोलावल्याचे समजते. मात्र जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरस्ते यांना बोलावले होते तर मुख्यमंत्री शिंदे आणि बोरस्ते यांची भेट का झाली नाही. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. अजय बोरस्ते हे एकटेच मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते तर मग त्यांच्याबरोबर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे का नव्हते ? याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये तर्क- वितर्क लढवले जात आहेत. सुरुवातीच्या काळात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गटाचे सर्व नेते झाडून उपस्थित होते . मग बोरस्ते यांच्यासोबत का नव्हते . त्याचबरोबर शिंदे गटातील नेत्यांमध्येच आपसातच रस्सीखेच तर सुरू नाही ना ? अशी चर्चा देखील होऊ लागली आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार हेमंत गोडसे यांनी ठाण्यात पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते दादर असा प्रवास एकच गाडीतून केला यावेळी नाशिक लोकसभेबाबत चर्चा झाल्याचे समजते ही जागा शिवसेनेला मिळावी याबाबत एकनाथ शिंदे अनुकूल असल्याची माहिती मिळते आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवाराचे पत्ते उघड केले नाहीत. पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी असे पुन्हा म्हटले. त्याचबरोबर उमेदवार ठरवण्याचा अधिकार पूर्णतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच आहे असे देखील दादा भुसे म्हणाले . तर दुसरीकडे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी देखील नाशिकच्या जागेबाबत आक्रमक असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमांना भेटी देत संवाद देखील साधला आहे. महाआघाडीतील प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार असल्याचे देखील छगन भुजबळ म्हणाल्याने महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अधिकच वाढत चालल्याचे दिसते . महायुतीकडून छगन भुजबळ यांच्या नावाचा गवगवा करून संभ्रम वाढविला जात आहे का ? अथवा महायुतीचा हा रणनितीचा भाग तर नव्हे ना ? असे असेल तर छगन भुजबळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर आश्चर्य वाटायला नको.

![]()











