गुन्हेगारी, भय, ड्रग्जमुक्त नाशिक आणि युवकांना रोजगारसंधी

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे,ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी वचनांची पंचसूत्री जाहीर केली आहे. भयमुक्त नाशिक, ड्रग्ज मुक्त नाशिक, बेरोजगारीत अडकलेल्या युवकांच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीच्या चक्रव्यूहातुन सुटका, व गोदमाईचा विकास, या वचनांच्या पंचसूत्रीद्वारे नाशिकचा विकास साधण्यासाठी आपण उमेदवारी करत असल्याचे गिते यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांबरोबर संवाद साधताना ते म्हणाले ड्रग्ज माफियांनी नाशिकला टार्गेट केल्याचे वर्षभरात झालेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे ड्रग्ज मुक्त नाशिक करणे हे माझे काम असेल तर भयमुक्त नाशिक संकल्पना मांडताना भाविकांचे शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला असून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चेन ओढणे, वाहन चोरी यामुळे नाशिककर घाबरलेले आहेत. यंत्रणेवरील राजकीय दबाव यामुळे पोलिसिंगलाही मर्यादा आल्या आहेत यासाठी जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आगामी काळात कार्यरत राहणार असल्याचे वसंत गिते यांनी सांगितले. युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी काम केले जाईल त्याचबरोबर नाशिक शहरात वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न असून मुंबई नाका, द्वारका, सारडा सर्कल यासारखे ब्लॅक स्पॉट व तेथील समस्यांचा तज्ञांद्वारे अभ्यास करून निपटारा केला जाईल तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्व असणारा कुंभमेळा २०२६-२७ मध्ये गोदाकाठी होत आहे. मात्र सध्या गोदावरीची अवस्था बिकट आहे आगामी कुंभमेळ्यासाठी गोदामाईचे संवर्धन तसेच गोदाकाठचा शाश्वत विकास करण्यासाठी नियोजन केले जाईल अशी ही ग्वाही मध्य नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी दिली

![]()












