हातात चाकू घेऊन रिल्स बनवणे भोवले, पोलिसांचे सोशल मीडियावर लक्ष

नाशिक : सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर फॉलोअर्स व लाईक मिळवण्यासाठी रील बनवण्यासाठी तरुणाई काहीही करण्यासाठी तयार असते. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामांसाठी होतो तितकाच अफवा पसरवणे व इतर कामांसाठी होत असल्याचे चित्र आहे .असे प्रकार नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात घडत असून अनेक गल्ली-बोळातील भाई आपला वाढदिवस साजरा करताना दहशत पसरविण्याचे देखील काम करत आहेत मात्र आता पोलिसांची वक्रदृष्टी या गल्ली भाईंवर पडली असून नाशिक शहरातील भास्क्या डॉन नावाच्या गल्ली-बोळातील एका गुंडाने धारदार चाकू वाढदिवसाच्या दिवशी घेत रिल्स बनवून “भास्क्या डॉन” या नावाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला मात्र पोलिसांची नजर या व्हिडिओवर पडताच त्याच्यासह इतर नाचणाऱ्या सहकाऱ्यांना गजाआड करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार पेठरोड परिसरातील तवली फाटा येथे राहणाऱ्या संशयित भास्कर एकनाथ ब्राम्हणे (वय 18) याने वाढदिवस साजरा करताना हातात भला मोठा चाकू घेत रिल्स काढले. त्याचबरोबर चाकू तोंडात धरून नाच- गाणे केले. त्याच्यासोबत अजून तिघे-जण नाचत होते त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला .आधिच सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असणाऱ्या पोलिसांनी काही तासातच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने सूरज मेहंदळे, नितीन लिलके, भास्कर ब्राम्हणे, वसंत जुनाटे यांना ताब्यात घेत गजाआड केले. शहर व परिसरात सोशल मीडियावर 302,307 किंग, डॉन असे शब्द वापरत हॅशटॅग देत त्याचबरोबर तलवार, चाकूसारख्या शस्त्राच्या इमोजी वापरून रिल्स किंवा फोटो पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस सायबर पेट्रोलिंगद्वारे करडी नजर ठेवत आहेत. अश्या घटनांवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सायबर पोलीस ठाणे ,गुन्हे शाखेच्या गुंडविरोधीपथक, युनिट-1व युनिट-2 च्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबर पेट्रोलिंगदेखील सतर्कपणे केली जात असून पोलिसांकडून, दररोज इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक एक्स या सारख्या सोशल साईड्सवर लक्ष ठेऊन असून आक्षेपार्ह पोस्ट असल्यास संबंधिताला कारवाईचा इशारा देत पोस्ट डिलीट करण्यास सांगितले जाते. तरीदेखील पोस्ट डिलीट न झाल्यास पोलीस त्या व्यक्तीवर कारवाई करतात त्यामुळे सावधान कुठलीही पोस्ट अपलोड करताना काळजी घ्या पोलिसांचे लक्ष तुमच्यावर आहे. पोलिसांनी कारवाई केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून यामुळे अनेकांची भाईगिरीची नशा उतरणार आहे.

![]()












