दागिन्यांबरोबर चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआरही केला गायब

नाशिक :शहरात मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी वाढली असून खून, पोलिसांवर हल्ले या घटनेनंतर आज शहरातील भरवस्तीत असलेल्या राका कॉलनी परिसरात चोरट्यानी डल्ला मारला असून माजी नागरसेविकेचे घर फोडत तब्बल एक कोटींच्या दागिन्यांची लूट केली आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या राका कॉलनीमध्ये असलेल्या नवकार रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर माजी नगरसेविका डॉ ममता शैलेंद्र पाटील राहतात काल मध्यरात्री पाटील यांच्या सदनिकेत अज्ञात चोरट्यानी कुलूप तोडून प्रवेश मिळविला व सुमारे एक किलोपेक्षा जास्त दागिने लुटून नेले. मुख्य म्हणजे या प्लॅटभोवती सुरक्षेसाठी लोखंडी ग्रील लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर उंबरठ्यावरच उजव्या कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेराही बसविण्यात आला आहे. चोरट्यानी लोखंडी ग्रील तोडल्यानंतर मुख्य लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी उंबरठा फोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटांची तोडफोड करत त्यामध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह, हिरेजडित एकापेक्षा अधिक मंगळसूत्रे, रोकडसह काही विदेशी चलन असा एक कोटींचा ऐवज या घरफोडीत चोरांनी लांबविल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घरातील पाटील कुटूंबीय हे दीड महिन्यांपूर्वीच धुळे येथे स्थलांतरित झाले आहे. मेडिकल कॉलेजच्या कामकाजामुळे ते धुळ्याला राहतात विकेंडला ते नाशिकच्या घरी येत असतात. माजी नगरसेविका ममता पाटील या धुळे येथे असलेल्या जवाहर मेडिकल कॉलेजच्या संचालक आहेत. 2008 यादरम्यान त्या नाशिक महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांच्या ममता पाटील चुलत बहीण आहेत.घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा गोळा करणारा कामगार आला असता त्याला दरवाजे उघडे दिसले .त्याने आवाज दिला मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने वॉचमनला कळवले व शेजाऱ्यांनी पाटील कुटूंबाला कळविले. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, मधुकर कड यांनी घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्हीचा डिव्हीआर गायब चोरट्यानी दागिने, रोख-रक्कम यासह सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज स्टोअर करणारे डिव्हीआर यंत्रदेखील काढून घेत पलायन केले. मात्र सोसायटीतील दुसऱ्या सीसीटीव्हीत एक मास्कधारी चोरटा कैद झाला आहे.

![]()











