पंचवटी परिसरात पोलीस अधिकाऱ्यावर दगडफेक, महिनाभरात दुसरी घटना

नाशिक :विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच गावगुंडांना उत आला असून सरळ पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्या पर्यंतची यांची मजल गेल्याने जनमानसात संतापाची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने हे अवधूतवाडी भागातून पंचवटी पोलीस ठाण्याकडे जात होते. याचवेळी त्यांना रस्त्यात फुलेनगर परिसरात काही मद्यपी युवक आपापसांत वाद घालून सार्वजनिक शांततेचा भंग करत मनाई आदेशाचे उल्लंघन करताना दिसून आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांची दुचाकी थांबवून हस्तक्षेप करत राडा घालणाऱ्या तरुणांना घरी जाण्यास सांगितले याचा राग मनात ठेवत समाजकंटकांनी त्यांच्या दिशेने दगड फेकले यावेळी दगड त्यांच्या चेहऱ्याला लागल्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आणि ते रक्तबंबाळ झाल्याने दगड फेकणाऱ्या तरुणांनी पळ काढला या घटनेची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांची वाहने घटनास्थळी पोहचली व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत रात्रीतून संशयित सुनील निवृत्ती पगारे, गणेश गौतम गायकवाड, पियुष रामदास सोनवणे (सर्व रा अवधूत वाडी) यांना गजाआड करत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे पंचवटी परिसरात पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड वरील सराई गुन्हेगार विकी संजय जाधव उर्फ गट्या याने रात्रीच्या वेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे यांच्या पोटात चाकू भोसकला होता त्यामुळे दोनदा पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला होत असेल तर नागरिक तरी कसे सुरक्षित असणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून पोलिसांचा वचक नसल्याची परिसरात चर्चा आहे.


![]()












