गुन्हेगारांचे थेट पोलिसांनाच आव्हान,सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने नागरिक दहशतीखाली

नाशिक : टोळीयुद्ध,गोळीबार आणि खुलेआम दहशत पसरविण्याच्या घटनांनंतर शहर परिसरात गेल्या 12 तासात खुनाच्या 2 घटना घडल्या आहेत. शहरात सरळ-सरळ गुन्हेगार हे पोलिसांनाच आवाहन देत असून कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर येथून जगदीश भैय्या वानखेडे (वय 22) हा तरुण दुचाकीवरून जात असताना तुला गाडी नीट चालवता येत नाही का ? सारखा हॉर्न का वाजवतो असे म्हणत पैशांची देखील मागणी या टोळक्याने केली होती. त्यानंतर तरुणांच्या टोळक्याने अचानक वानखेडे या तरूणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली. हा तरुण सातपूर येथील एका कंपनीत कामगार होता. पार्थ पॅलेससमोर रात्री साडेदहा ते अकरावाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. हा तरुण मूळचा सटाणा या गावचा होता. तर बुधवारी रात्री ही घटना घडलेली असतानाच गुरुवारी दुपारी भरदिवसा इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राशीद हारून खान (वय 21) रा. अंबड परिसर असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, इंदिरानगर परिसरातील सेल पेट्रोल पंपाच्या मागे ही घटना घडली आहे. यावेळी दुचाकीवरून चार तरुण आले त्यांच्या हातात कोयत्या सारखे शस्त्र होते. राशीद खान हा तरुण कॅफेत चहा पिण्यासाठी थांबला असतानाच या तरुणांनी कॅफेत घुसन त्याच्यावर सपासप कोयत्याने वार करत हे तरुण दुचाकीवर बसत हातातील कोयते हवेत फिरवत पसार झाले. याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून ते व्हायरल झाले आहे. सकाळपासून शहरात अत्यंत निर्घृणपणे वार करणाऱ्या खुनाचे दोन्ही व्हिडीओ फुटेज व्हायरल झाल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. तर आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व कुंभमेळा मुळे पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीचे मोठे आवाहन उभे ठाकल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून नवरात्र उत्सवाच्या काळात अश्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्याने पोलिसांची ढिसाळ कार्यपद्धती उघड झाली आहे. दररोजच्या खून, हाणामारीसारख्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

![]()












