घरात घुसून खून करण्याची नाशकात ही दुसरी घटना

नाशिक : नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून काही दिवसांपूर्वी भावा समोर भावाचा घरात घुसून खून करण्यात आला आणि आज पुन्हा घरात घुसून एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे . म्हसरूळ परिसरातील गुलमोहर नगर भागात मध्यवस्तीत राधानंद अपार्टमेंट मधील प्लॅटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कसुम एकबोटे, व त्यांची मुलगी ज्योती एकबोटे या भाडेतत्त्वावर राहतात. ज्योती एकबोटे देखील वयस्कर असल्याने त्या आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी इतरांच्या घरी पोळ्या लाटण्याचे काम करतात. त्या सकाळी कामावर निघून गेल्या परिसरात घंटागाडी आल्याने कुसुम एकबोटे या कचरा टाकण्यासाठी खाली आल्या ती वेळ 11 वाजेची होती. कचरा टाकल्यानंतर त्या पुन्हा दुसऱ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमध्ये गेल्या .एकबोटे यांच्या शेजारचा फ्लॅट कुलूपबंद होता .या दरम्यान हल्लेखोराने घरात प्रवेश करत त्यांच्या मानेवर धारदार विळ्याने वार करून पळ काढला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घरात घुसून वृद्ध महिलेचा खून झाल्याचा कॉल पोलीस वायरलेसवरून झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेचे पथक श्वान पथक घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान गुगल या श्वानाने घटनास्थळी रक्ताने भरलेला विळ्याचा वास घेतला आणि त्यावरून जोरजोराने भूकंत संशयिताचा माग पोलिसांना दाखविला. त्याच बरोबर या श्वानाने शेजारी बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाकडे पहात जोरजोरात भूकंत असल्याने पोलिसांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून पहाणी केल्याचे कळते .मुख्य म्हणजे कसुम एकबोटे 80 वर्षाच्या वृद्ध,त्यांच्या सोबत असणारी त्यांची वृद्ध मुलगी भाडेतत्त्वावर राहत होते. आपल्या उदरनिर्वाह साठी दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक करत होत्या. तरीदेखील कोणी माथेफिरू येतो भरदिवसा 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा विळ्याने गळा चिरतो आणि फरार होतो ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांची पथके रवाना झाली असून संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी गंजमाळ परिसरातील पंचशील नगर मध्ये रात्री मध्यवस्तीत भावा समोरच भावाचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याने नाशकात संतापजनक भीती पसरली असून गुन्हेगार सरळ-सरळ पोलिसांना आव्हान देत असून शहरात कायदा-सुव्यवस्थाचा धाकच संपल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

![]()











