जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच नाशिक शहरात मुंबईहुन खास हेलिकॉप्टरने एबी फॉर्म आल्याची बातमी ब्लॅक अँड व्हाईट न्यूजने प्रसिद्ध केली होती. आता हेलिकॉप्टरने आलेल्या एबी फॉर्मच्या घटनेच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे समजते. देवळाली मतदारसंघ हा “महायुती”तील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटल्यानंतर विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना उमेदवारी देण्यात आली असताना अर्ज दाखल करण्याचा आधी देवळाली मतदारसंघाच्या बाबतीत नाट्यमय घडामोडी घडत देवळाली मतदारसंघासाठी महायुतीतील घटक असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने खास हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्यात आला आणि शेवटच्या काही मिनिटात दाखल करून राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. यादरम्यान दिंडोरी, इगतपुरी साठी देखील हेलिकॉप्टरने एबी फार्म आल्याची माहिती उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत जिल्हा निवडणूक शाखेला विचारणा केली. यामध्ये हे हेलिकॉप्टर कोणी आणले ?त्यात कोण होते ? कोणत्या उमेदवारासाठी हे फार्म आले ?त्यासाठी किती खर्च आला ? आदी प्रश्न निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला केल्याचे समजते.

याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली असून याबाबत एअर ट्रापिक कंट्रोल विभागाकडे विचारणा केली आहे. चौकशी सुरू असून त्याचा अंतिम अहवाल आल्यावर कारवाई निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. हा खर्च उमेदवाराच्या खात्यात टाकला जाईल की पक्षाच्या खात्यावर टाकला जाईल हे पाहणे महत्वाचे ठरेल .जर उमेदवाराच्या खात्यावर खर्च टाकला गेला तर अडचणी निर्माण होऊ शकतात कारण उमेदवाराच्या खर्चाला मर्यादा आहेत.


![]()











