हल्ला सीसीटीव्हीत कैद

नाशिक : शहरात महापालिका निवडणुकांआधी पोलिसानी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणण्यास भाग पाडले होते त्यावेळी पोलिसांच्या भीतीने अनेक गुन्हेगारांनी नाशिक सोडणे पसंत केले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढले असून काल रात्री सिडको परिसरातील दत्त चौक परिसरात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुयश पाटील हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत काल रात्री सुयश पाटील हे सेंट्रल पार्कच्या पाठीमागील बाजूस त्यांच्या सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कार्यालय बाहेर बसले असताना पंकज सोनवणे, विजय कांची, वैभव निकम, यांच्यासह चार ते पाच जणांच्या टोळक्याने पाठीमागून अचानक येत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यानंतर हल्लेखोरांनी पाटील यांच्या कार्यालयाची नासधूस केली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत पाटील यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. हल्ला जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पोलिसांनी रात्री अकरा वाजता धरपकड मोहीम राबवली यातून काही संशयितांना त्यांना ताब्यात घेतल्याचे कळते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सुयश पाटील हे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार होते.

![]()












