विसर्जन मिरवणूक सुमारे दीड तास जागेवरच ठप्प

नाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकडी बारव येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत मानाच्या महापालिकेच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलिसांनी प्रत्येक मंडळाला एका ढोल पथकाची मर्यादा लागू केली आहे. महापालिकेच्या मिरवणुकीत दोन ढोल पथके असल्याने एक ढोल पथक काढून घेण्याची सूचना पोलिसांनी केली. यावेळी ढोल पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून मुभा मिळविण्यासाठी धडपड केल्याचे सांगितले जाते. यादरम्यान शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक कुठेही रेंगाळू नये म्हणून पोलिसांकडून मोठ्याप्रमाणात सक्ती केली जात असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने गोंधळ उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या या दबावामुळे आणि घाईघाईने मिरवणूक पुढे दामटण्याच्या भूमिकेमुळे ‘नाशिकचा राजा’ आणि ‘साक्षी गणेश मंडळ’ यांसह इतर मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले.कार्यकर्त्यांनी शालिमार चौक आणि महात्मा गांधी रोड परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे विसर्जन मिरवणुकीला काही काळ ब्रेक लागून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह सांगली बँक सिग्नल, मुंदडा मार्केट आणि शालिमार चौकात थेट रस्त्यावर ठिय्या मांडला आणि पोलिसांच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.त्याचबरोबरअनेक मंडळांनी बाहेरून कला पथके बाहेरून मागवली आहे. तसेच लेझीम पथक, ढोल पथक पारंपारिक वाद्य पथक देखील आहेत. मात्र नागरिकांना ते दाखवता येत नसल्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आंदोलक कार्यकर्ते आणि गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। सुमारे अर्धा ते पाऊण तासांच्या चर्चेनंतर तोडगा निघाला आणि कार्यकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले, ज्यानंतर मिरवणूक पुन्हा हळूहळू पुढे मार्गस्थ झाली एक ते दीड तासानंतर थांबलेली मिरवणूक हळूहळू पुढे मार्गस्थ होऊ लागली.

![]()












