गुन्हेगारांचा कायद्याला ठेंगा..

नाशिक: शहरात खुनाच्या घटना सुरूच असून गुन्हेगार सरळ-सरळ पोलिसांना आव्हान देत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी भागात तरुणाचा खून करण्यात आला आहे. कृष्णा दीपक ठाकरे (वय 24) असे मृत युवकाचे नाव असून, गुरुवारी (दि. 2) रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनी कुरापत काढत धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कृष्णा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने कृष्णा याला बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मारेकरी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. जुन्या वादातून व दांडिया खेळताना झालेल्या भांडणातुन खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

![]()












