शिंदे गटाच्या मा. नगरसेविकेचे पती गंभीर जखमी

नासिक रोड: चेहडी पंपिंग जवळील खर्जुल मळा, मोरया पार्क परिसरात लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आवाज व गोधळ कमी करा असे सांगितल्याचा राग आल्याने चार जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मा नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती व बांधकाम व्यावसायिक नितीन खर्जुल यासह इतर तिघांवर धारधार हत्याराने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मोरया पार्क येथील संदीप गाढवे यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने घरासमोर छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सुरू असलेला आवाज कमी करा, गर्दी गोधळ करू नका असे किरण खर्जुल यांनी सांगितले. वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. रात्री अकराच्या सुमारास किरण खर्जुल हे घराजवळ चक्कर मारत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी काही एक विचार न करता किरण खर्जुल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढविला यामुळे जोरदार आवाज झाल्याने घरातील नगरसेविकेचे पती नितीन खर्जुल हे बाहेर येऊन भांडण सोडवत असताना त्यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूला वार करण्यात आले. नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या काही तासातच रवींद्र गाढवे, संदीप गाढवे या संशयिताना ताब्यात घेतले.पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके करत आहेत.

![]()











