अनेक घटनांमध्ये कोयत्याचा वापर, नागरिकांमध्ये दहशत

नाशिक : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत. त्यामध्ये कोयत्याचा मोठ्याप्रमाणात वापर होत असल्याने नाशिक शहरात कोयता गॅंग तर सक्रिय झाली नाही ना ? अशी भीती सामान्य नागरिक व्यक्त करत असून काल कोयत्याने ज्या पद्धतीने तरुणाचा खून करण्यात आला त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे मनपाचा वॉटरग्रेस कंत्राटी कर्मचारी आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे (21,रा. घारपुरे घाट) हा साफसफाई करण्यासाठी जुनी पंडित कॉलनी परिसरात आला असता त्याने कामगारांचे सफाई करतानाचे फोटो मोबाईलमध्ये काढून घेतल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याला घेराव घालत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले क्षणार्धात आकाश हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला यानंतर हल्लेखोर गंगापूर रोडच्या दिशेने वेगाने पळून गेले. यादरम्यान सकाळच्या सुमारास गर्दी नसल्याने परिसरात असलेल्या सफाई कामगारांनी धाव घेत आकाशला जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले . यावेळी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता जवळच असलेल्या झाडांच्या कुंडीत टाकला होता. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. गुगल या श्वानाने घटनास्थळी सापडलेला कोयता हुंगला अन थेट मविप्र चौकाकडे आपला मोर्चा वळवला आणि पुन्हा चोपडा लॉन्स पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने धाव घेतली व भुंकण्यास सुरवात केली. पोलिसांनी लागलीच पथके तयार करत शोध घेण्यास सुरुवात केली असता गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने संशयित हल्लेखोरांपैकी मुख्य संशयीत अर्थव अजय दाते (20 घारपुरे घाट, अभय विजय तरे (19 ,रा रविवारपेठ) या दोघांसह एका ही विधीसंघर्षित बालकाला नऊ तासांच्या आत पेठ येथून ताब्यात घेतले त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी खुनाचा गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली . खून प्रकरणातील 4 था आरोपी संशयित मकरंद देशमुख यास मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले.

गणेशोत्सवातील भांडण भोवले संशयित तिघे व मयत आकाश यांच्यात २०२१ पासून वाद आहेत. त्याप्रकरणी दोघांविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहे. दरम्यान, गेल्या गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये गणपती बसविण्यावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयित आकाशवर पाळत ठेवून होते. त्यानुसार मंगळवारी पहाटे संधी मिळताच त्यांनी त्याच्यावर खूनी हल्ला केला. आकाशच्या शरीरावर ११ खोलवर वार होते.
खंडणीसाठी कोयत्याचा धाक अजून एका घटनेत सुभाष रोड केबिएन मार्केट येथील व्यापाऱ्याला पाच दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगाराने कोयत्याचा धाक दाखवून दर महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. मार्केट इमारतीत गोपाल ईश्वरदास किसनाने यांचे जनरल वस्तूंचे होलसेल दुकान आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास किसनानी हे आपले दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना संशयित सनी श्याम भाटिया (रा गुलजारवाडी सुभाष रोड) हा त्यांच्या दुकानात आला मला दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणी द्यायची अशी मागणी केली किसनानी यांनी पैसे देऊ शकत नाही असे सांगितल्यावर सनी याने कोयता काढून दाखवत शिवीगाळ दमदाटी करून निघून गेला.अखेर त्यास आज पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 2 अटक केली असून त्याच्याविरुद्ध खंडणी, वसुलीसह विनापरवानगी परिसरात वावरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
युवकावर कोयत्याने सपासप वार अमृतधाम लिंक रोडवर एका बिअर शॉपी समोर मित्रांसोबत उभे असलेल्या 28 वर्षे युवकावर दुचाकी तसेच रिक्षातून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळीने हल्ला चढून कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेत त्रिकोणी बंगला परिसरात राहत असलेला रोहित माळी हा युवक जखमी झाला आहे

![]()












