“नाईट आउट” पार्ट्यांचे क्लब रात्री उशिरापर्यंत चालतात तरी कसे ?

नाशिक : शहरातील उचभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर परिसरात मद्यधुंद झालेल्या तरुणीने गोधळ घालत पोलिसांबरोबर मुजोरगिरी केल्याचा या तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकारामुळे शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत मुंबई, पुण्याचे लोण नाशिकपर्यंत येऊन पोहचल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .मिळालेल्या माहितीनुसार एका क्लबमधून नाईट-आउट पार्टी करून गंगापूररोडच्या प्रसाद सर्कलवर आरडाओरडा करत गोंधळ घालणाऱ्या मद्यधुंद तरुण-तरुणींचा कॉल पोलिसांना मिळाला. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी पोहचले गोधळ घालणारे काही तरुण -तरुणी याठिकाणी थांबून होते. यावेळी पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता मद्याच्या नशेत बेभान झालेल्या तरुणी बरोबरच एका तरुणाने देखील पोलीस पथकाबरोबर वाद घातला. मुख्य म्हणजे हा वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे .
या व्हिडिओत इतर तरुणांपेक्षा एक तरुणी जास्त आक्रमकपणे पोलिसांबरोबर वाद घालताना दिसली .मुख्य म्हणजे ती तरुणी नशेत इतकी टल्ली झाली होती की तिला तिच्या पायावर देखील व्यवस्थित उभे राहता येत नव्हते आणि ती पोलिसांना कायद्याचे ज्ञान देत होती हे विशेष, गंगापूर पोलिसांनी त्या तरुणीच्या नातेवाईकांना रात्री बोलावून घेत उद्या पुन्हा पोलीस ठाण्यात अटीवर सोडून देण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी ते न आल्याने सोमवारी नातेवाईकांशी संपर्क साधत पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना केल्या गेल्या . संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची वेगळी ओळख असताना मुंबई, पुण्या पाठोपाठ आता या मद्यधुंद तरुण -तरुणींकडून नाशकात देखील नशेत बेभान होऊन शांततेचा भंग करण्याचे प्रकार सुरू झाले असून यामुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मद्यधुंद तरुण-तरुणींकडून कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसांबरोबरच अरेरावी करण्याचे प्रकार पाहून सामान्य नाशिककरांचा पारा चढू लागला आहे . मुळात काही महिन्यांपूर्वी एमडी ड्रग्ज मुळे नाशिकचे नाव देशात दूरपर्यंत गेले होते, नाशिकरोड येथील एमडी ड्रग्जचा कारखानाच पोलिसांनी उध्वस्त केल्यानंतर नाशिककरांच्या पायाखालची वाळूच सरकली होती .या ड्रग्जच्या विळख्यात अनेक तरुण -तरुणी अडकलेल्या असताना या एमडी ड्रग्जचे लोण गंगापूररोड सारख्या उच्चभ्रू वस्तीपासून तर वडाळा गावच्या कष्टकरी जनतेपर्यंत पोहचल्याने नाशिककर काळजीत असतानाच आता तरुणी देखील मद्यधुंद अवस्थेत दिसू लागल्याने नागरिकांची काळजी वाढू लागली असून आता आपला मुलगा अथवा मुलगी बाहेर काय करते ? तिच्या मित्रमैत्रिणी कोण ? याकडे गोष्टीकडे लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपल्याची चर्चाच नागरिकांमध्ये घडू लागल्याचे चित्र दिसत आहे. नाईट क्लब उशिरापर्यंत चालतात कसे ? शहरात एकीकडे 10 वाजल्यानंतर इतर दुकाने बंद होतात, अनेक परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो मग या “नाईट आउट” पार्ट्यांचे क्लब शहरात रात्री पर्यंत कसे आणि कोणाच्या आदेशाने सुरू असतात ? यामुळे वाद विवाद होतात, शांतता भंग होते, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो मग पोलिसांनी यांच्यावर कारवाई का करू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

![]()












