नाशिकच्या गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवरील घटना

नाशिक : व्हॅलेंटाईन साठी तरुणाई सज्ज होत असतानाच नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार घडला असून प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणीवर तिच्याच ओळखीच्या युवकाने एकतर्फी प्रेमातुन धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर दोन तरुण व एक तरुणी फिरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यात चर्चा सुरू असताना संशयित केदार गणेश जंगम (21, दिंडोरी रोड) हा देखील होता यादरम्यान चर्चा सुरू असताना वादाची ठिणगी पडली अन वाद प्रचंड विकोपाला गेला यावेळी जंगम याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने युवतीच्या पोटावर वार केले. यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी धाव घेत केदार जंगम यास चोप दिला. तत्काळ ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली असता तत्काळ मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व केदार जंगम यास ताब्यात घेत रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यादरम्यान तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व वेळीच उपचार मिळाल्याने तरुणीचा जीव वाचला असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. प्रेमाच्या त्रिकोणातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून केदार जंगम याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

![]()











