सुप्रीम कोर्टाने मतपत्रिका वापराची याचिका फेटाळली

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनला दोष देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर के ए पॉल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत देशात निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरू करण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत कोर्टात याचिका दाखल करणाऱ्याची जोरदार कानउघाडणी केली. न्या. प्रसन्न वराळे, न्या विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने म्हटले की पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? असा सवाल केला. यावेळी एलॉन मस्क यांच्या ईव्हीएम मशीन बाबतच्या विधानाचा संदर्भही कोर्टात देण्यात आला. तसेच चंद्रबाबू नायडू आणि वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी देखील ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकाही कोर्टात सांगितल्या. यावर बोलताना कोर्ट म्हणाले चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा पराभूत होतात, तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड केलीये. पण जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत. याकडे आपण कसे बघायचे? असा सवाल कोर्टाने विचारला. तसेच जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड नसते. पण, जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा ईव्हीएमसोबत छेडछाड झालेली असते. जगापेक्षा तुम्हाला वेगळे का नकोय?, असेही न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना विचारले. या याचिकेत आमिष प्रकरणात दोषी उमेदवारांना अपात्र ठरविण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्ते पॉल म्हणतात निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी मी ही याचिका केली आहे त्यावर खंडपीठ म्हटले, तुम्ही फार कल्पक याचिका करतात, तुम्हाला या सर्व कल्पना कशा सुचतात.

![]()












