पोलिसांवर दगडफेक करणे हे खूप दुर्दैवी

नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्यात आली आहे. मात्र याआधी बंदोबस्ताची तयारी करणाऱ्या पोलिसांवर मध्यरात्री मोठा जमाव चाल करून आला. रात्री जमावाकडून पोलिसांवर मोठ्याप्रमाणात दगडफेक करण्यात आली. यामध्ये 31 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व जखमी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची विचारपूस व भेट घेण्यासाठी भाजप आमदार देवयानी फरांदे या जिल्हा रुग्णालयात पोहचल्या.

यावेळी आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, आज जी दर्गा काढण्यात आली त्याचे मी स्वागत करते. गेल्या 25 वर्षांपासून स्थानिक नागरिक त्यासाठी लढा देत होते. 2000 साली ही दर्गा रात्रीतून उभी केली होती, त्याचे अनेक पुरावे नागरिकांनी दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानंतर आज ही दर्गा हटवण्यात आली. मुस्लिम धर्मगुरू आणि पोलीस प्रशासन यांची बैठक झाली आणि त्यानंतर ही दर्गा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काल मध्यरात्री अचानक काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि त्यात काही पोलीस गंभीर जखमी आहेत. पोलिसांवर दगडफेक करणे हे खूप दुर्दैवी आहे. हा देश संविधानावर चालतो, झुंडशाहीवर चालणार नाही. ज्यांनी हे दगडफेक केली त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी त्यांची भूमिका चोख पद्धतीने बजावली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करते, स्थानिक हिंदू नागरिकांनी केलेली मागणी आज त्यांनी पूर्ण केली, असेही देवयानी फरांदे म्हणाल्या.


![]()












