पुढील राजकीय वाटचालीबाबत संकेत देण्याची शक्यता

नाशिक : दादर येथील शिवाजी पार्कच्या मैदानात रविवारी (30) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून या मेळाव्याला राज्यभरातून मनसे सैनिक येणार असल्याने भव्य आसन व्यवस्था करण्यात आली आहे.मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता असतानाच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या टिझर मध्ये राज ठाकरेंच्या नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या भाषणाचे काही मुद्दे ऐकायला मिळत आहेत. “निछड्या छातीचा मराठी अभिमान”, “अभेद्य एकजूट” असे काही शब्दही पाहायला मिळत आहे. तसेच या भाषणादरम्यान त्यांनी मी येत्या ३० तारखेला बोलणार आहे, जल्लोषात, गुलाल उधळत सर्वांनी शिवतीर्थावर यावे, अशी मी विनंती करतो, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्याचबरोबर काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्याने राज ठाकरे याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता असून काही दिवसांपूर्वी कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी करणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या कामाचा लेखाजोखा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यासाठी संरचना करण्यात येत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात सांगितले होते. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयांवर धुरळा उडाल्याचे चित्र असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने-सामने आले आहेत. यामध्ये टीकेचा स्तर देखील घसरल्याचे चित्र असून यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तर कुणाल काबरा,दिशा सालीयन पर्यंतच्या मुद्यांवरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याने या विषयानवर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने त्यानिमित्ताने जोरदार तयारी सुरू आहे.

![]()












