जाहीर सभेत इतर पक्षांचे पदाधिकारी व मा नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्यातील नागरिकांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आभार दौरा आता नाशिकमध्ये असून आज शुक्रवारी (दि 14) सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. या निमित्ताने शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शहरात जोरदार तयारी सुरू आहे. शहरात शिंदे गटाची ताकद वाढत असून आजपर्यंत इतर पक्षातील 25 माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले असून आज होणाऱ्या सभेत इतर पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत मनसे, कॉग्रेस, ठाकरे गटाच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यात शिंदे गटाची शिवसेना यशस्वी झाल्याचे चित्र असून आगामी महापालिकेच्या निवडणुकीत याचे परिणाम दिसू शकतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून सर्वप्रथम त्रंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण दुपारी दोन वाजता त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे हे महापालिका तसेच एनएमआरडीए यांच्यासह अन्य यंत्रणांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी व महानगर प्रमुख प्रवीण(बंटी) तिदमे यांनी केले आहे.

![]()












