शहरात खुलेआम खून,हल्ल्यांचे प्रकार चिंताजनक

नाशिक : शहरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून कायद्याला ठेंगा दाखवत सरळ सरळ हल्ला करत हत्या करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून यामध्ये अल्पवयीन मुलांनाच वाढता सहभाग चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर सराईत गुन्हेगार देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र नाशिक शहरात निर्माण झाले आहे. कालच सराईत व तडीपार गुंडांमध्ये अवैध धंद्याच्या पैशांवरून वाद झाल्याने एकाचा खून करण्यात आला. या घटनेला काही तास झाले असतानाच नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या युवकावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा नावाच्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला असून कृष्णा हा वाहनामध्ये घाडगे मळा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. पण तिथे असलेल्या टोळक्याने अचानक कृष्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत कृष्णा गंभीर जखमी झालेला असून हल्ल्याचा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

![]()












