महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे आज बिगुल वाजणार

नाशिक :भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. काल दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते. याशिवाय, आज दुपारी 12 वाजता राज्यपालनियुक्त 7 आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल २८८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होईल. महायुतीमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना; अशी थेट लढत होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तिसरी आघाडी या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.


![]()











