मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना

नाशिकरोड : येथील गंधर्वनगरी परिसरात धक्कादायक व संतापजनक घटना घडली असून एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी राहणाऱ्या मजुराच्या मूकबधिर असलेल्या आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गंधर्वनगरी परिसरात एका सहा मजली इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीत बांधकाम करण्यासाठी जवळपास पंधरा मजूर असून याठिकाणी परजिल्हातील पाच मजुरांचे कुटूंबदेखील वास्तव्यास आहे.यातील एका कुटुंबातील आठ वर्षाचा मुलगा रविवारी अचानक बेपत्ता झाला. तो मुलगा मूकबधिर असून त्याला बोलता येत नसून श्रवणशक्ती कमकूवत होती. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कुटूंबाने केला मात्र रात्रीच्या सुमारास इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका डग मध्ये तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले सुरुवातीला उंच इमारतीवरून पडल्याने मुलगा गंभीर जखमी होऊन मयत झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता त्याच्या हात पायांना दुखापत देखील झालेली होती. मात्र मृतदेहाचे सोमवारी शासकीय जिल्हा रुग्णालयात शहविच्छेदन करण्यात आले.यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. अनैसर्गिक अत्याचार व पाठीच्या बरगड्या तुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची ही गंभीर बाब समोर आली. अज्ञात संशयिताने मुलावर अनैसर्गिक रित्या अत्याचार केल्यानंतर त्यास इमारतीच्या डग मध्ये टाकून खून केला असावा असा संशय उपनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना समोर येताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी सुरू करण्यात आली. त्या इमारतीत काम करणारे सर्व मजूर, कारागीर महिला, यांची उपनगर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणाहून कोणी गायब झाला आहे का ? याचाही तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून उपनगर पोलीस ठाण्यात खुनासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची तीन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत असून संशयितांना बेड्या ठोकत कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

![]()












