इंडिया आघाडी बसणार विरोधी पक्षात

नाशिक : लोकसभा निवडणुकीत 293 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत झालेल्या बैठकीत तेलंगू देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्या सह सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचे पत्र सादर केले. त्यामुळे निकालानंतर चंद्राबाबू आणि नितेश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी सतरावी लोकसभा तातडीने विसर्जित केली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत केंद्रीय मंत्री मंडळासह पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी देखील पंतप्रधानासह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला तरी नव्या सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपली सेवा बजवावी अशी सूचना केली आहे. इकडे हालचालींना वेग आला असून एनडीएच्या सर्व खासदारांची शुक्रवारी 7 जून रोजी दुपारी दोन वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येईल. तत्पुर्वी सकाळी 11 वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेते पदी निवड केली जाईल. या बैठकीनंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर आठ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पार पडली. इंडिया आघाडी सध्यातरी विरोधी पक्षात बसणार असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपचा नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीबीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात त्यानंतरच इंडिया आघाडी आपली पुढील रणनीती आखणार आहे.

![]()














