फायनान्स कंपनीतील शिपाई पोलिसांनी केला जेरबंद

गंगापूर रोड :परिसरातील गृह कर्ज सहाय्य करणाऱ्या आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत काही दिवसांपूर्वी कार्यालयातील सेफ्टी लॉकर उघडून दोघा मास्कधारी अज्ञात चोरट्यांनी चार कोटी 92 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा उलगडा सात दिवसांनी झाला असून याच बँकेतील शिपाई तुकाराम देवराम गोवर्धने (रा सांजेगाव तालुका इगतपुरी ) याच्या मदतीने तीन जणांनी कट रचून सोने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील चक्रावून टाकणारी घटना म्हणजे नाशिक मुंबई महामार्गावर राजुर फाट्याजवळ सांजेगाव तालुका इगतपुरी येथील कुस्तीपटू भूषण लहामगे याचा अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या झाडत तसेच धारदार शस्त्राने वार करत खून केला होता. या प्रकरणातील खून झालेला भूषण लहामगे त्याचा चुलत भाऊ वैभव लहामगे याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या खुनातील संशयित वैभव लहामगे हाच नाशिक शहरातील फायनान्स कंपनीतून 5 कोटींचे दागिने चोरणारा मास्टरमाइंड निघाला. शहराच्या गजबजलेल्या गंगापूर नाका परिसरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरांनी घुसून जवळपास 4 कोटी 92 लाखांचे दागिने लंपास केले होते. त्यातील एकाने कोरोना सेफ्टी सूट तर दुसऱ्याने जीन्स टी शर्ट घातला होता. दागिने घेऊन पोबारा करणारे चोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. यातील संशयित हे बँकेच्या खिडकीतुन उतरत दुचाकीवरून फरार झाल्याचे दिसत होते.त्यामुळे पोलिसांनी चोरटे ज्या रस्त्याने गेले, त्या रस्त्यावरील सीसीटीव्हीवरून त्यांचा माग काढला. सुमारे 11 किलोमीटर अंतराचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यानंतर पोलिसांनी सिडको परिसरातील महाराणा प्रताप चौकातील सतीश चौधरी व रतन जाधव या चोरट्यांची ओळख पटली मात्र पोलीस येण्यापूर्वीच ते चोरटे फरार झाले. मात्र पोलिसांनी पुढील चौकशी सुरू ठेवत या दोघांचे बँकेत कोणी ओळखीचे आहे का ? याची माहिती घेतली असता याच बँकेतील शिपाई तुकाराम देवराम गोवर्धने बरोबर त्या चोरट्याचे संबंध असल्याची माहिती पुढे आली .पोलिसांनी लागलीच शोध घेत तुकारामला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. तर इकडे काही दिवसांपूर्वी नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात प्रसिद्ध कुस्तीपटू भूषण लहामगे (40,रा सांजेगाव ता. इगतपुरी) हा घरी जात असताना त्याला वाटेत अडवून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला व चॉपरने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ संशयित वैभव लहामगे,काका यशवंत लहामगे,व काकू यांच्या विरोधात वाडीवरे पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. जमिनीसह आर्थिक वादातून भूषण याने हत्या केल्याचे तपासात समोर येत आहे. हत्येनंतर यशवंत लहामगे यास पोलिसांनी अटक केली तर पसार झालेल्या वैभवला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.अन त्याच्या काही तासांमध्ये बँकेतील दरोड्याचा उलगडा झाला तुकाराम गोवर्धने याने याही गुन्ह्यात वैभव लहामगेचे नाव सांगितले त्याला बँकेची माहिती, खिडकी, लॉकरची जागा, सीसीटीव्ही, अलार्म याची माहिती पुरवली त्यातून वैभव याने त्या दोघ्या चोरट्यांसोबत जवळपास 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, या घटनेतील मास्टरमाइंड वैभव व बँकेतील शिपाई तुकाराम हे एकाच गावचे (सांजेगाव,इगतपुरी) रहिवाशी असून दोघे मित्र देखील आहेत. या घटनेबद्दल पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की यातील संशयित सतीश चौधरी याने चोरी केलेले सोने त्याची आई रेखा हिच्या ताब्यात दिले असून चोरलेल्या सोन्यापैकी काही सोने वितळून सोन्याच्या लगड तयार करण्यात आल्या होत्या त्या 39 लाख 52 हजार 350 रुपये किमतीच्या लगड जप्त करण्यात आल्या आहेत *वैभव हा सराईत गुन्हेगार* सन 2016 मध्ये ठाणे येथील चेकमेट सर्विसेस या कंपनीत दरोडा टाकून एक कोटी चाळीस लाखांची रक्कम जव्हार मध्ये लपविण्यात आली होती. या प्रकरणात देखील संशयित वैभव लहामगे होता. त्याचबरोबर सन 2023 मध्ये नाशिक पोलिसांनी सोलापूर एमडी कारखाना प्रकरणात अमोल वाघ याला अटक केली होती अमोल हा वैभव सोबत ठाण्याच्या दरोड्यात सहभागी होता. त्यावेळी कारागृहात त्यांनी इतर साथीदारांंबरोबर एमडी ड्रग्जची माहिती घेतली होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिताराम कोल्हे यांनी युनिट एक व दोनच्या पथकास मार्गदर्शन केले त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हस्के, प्रवीण वाघमारे, नाजिम पठाण, संदीप भांड, शरद सोनवणे विशाल देवरे ,देविदास ठाकरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, किरण शिरसाट आदींच्या पथकाने केली


![]()














