अँड उज्वल निकम विरुध्द कॉग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यात थेट लढत

मुंबई :उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ चुरशीचा ठरणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने कॉग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होताच. महायुतीतील भाजपाने आपले पत्ते ओपन करत ज्येष्ठ विधीज्ञ व पद्मश्री उज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली. याआधी या मतदारसंघासाठी भाजपकडून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेत्री माधुरी दीक्षित, पूनम महाजन यांची नावे चर्चेत होती. मुख्य म्हणजे भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम महाजन या मतदारसंघात दोनदा खासदार राहिल्या आहेत, त्यांचा पत्ता भाजपा नेतृत्वाने कापल्याने त्यांची यावेळी हॅट्रिक करण्याची संधी हुकली. पूनम महाजन या पंकजा मुंडे यांच्या आते बहीण आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या कन्या आहेत. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री होत्या काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून 2004 पासून सतत चार वेळेस निवडून आल्या आहेत. काही वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे . तर सध्या त्या मुंबई कॉग्रेसच्या अध्यक्ष आहेत. भाजपाने या मतदार संघातून जाहीर केलेले उमेदवार उज्वल निकम हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. उज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत 1993 मधील बॉम्बस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या न्यायालयीन प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिल्याने त्यांच्या नाव देशभरात चर्चेत आले. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या बलात्कार खून खटल्यातही ते विशेष सरकारी वकील होते. अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड विरुध्द अँड उज्वल निकम हा सामना चुरशीचा होणार असून लोकसभा 2004 च्या निवडणुकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबईत लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होती शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून मनोहर जोशी यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी चमत्कार केला.आणि जिंकले. गायकवाड “जॉईंट किलर” ठरले. मतदार संघाची सीमा बदललेल्या या मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांची कन्या व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड या वडिलांचा कित्ता गिरवणार का याचीच उत्सुकता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला लागून आहे.

![]()











