लढणार ते जिकण्यासाठी आता माघार नाही -स्वामी शांतिगिरी महाराज

नाशिक :यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक चांगलीच परीक्षा बघणारी ठरली आहे. नासिक लोकसभा कोणत्या पक्षाला सुटणार कोण, उमेदवारी करणार याबाबत मित्र पक्षांमध्येच मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे .रोज नवनवीन नावे समोर येत आहेत. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीबाबत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र हा अर्ज भरताना त्यांनी “शिवसेनेच्या” नावाने भरल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत महायुतीतर्फे व शिंदे गटातर्फे नाशिक लोकसभेसाठी कुठलाही अधिकृत उमेदवार अजूनही घोषित करण्यात आलेला नसताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा 1008 स्वामी श्री शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकण्यापूर्वी महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली होती. यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र काही कारणामुळे ही भेट होऊ शकली नाही. यादरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. मात्र महायुतीतील रस्सीखेच व महाविकास आघाडी करून ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली हे बघता महाराजांनी काही दिवसांपूर्वीच प्रचाराला सुरवात केली. शांतिगिरी महाराजांनी काही दिवसांपूर्वीच अपक्ष अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली यादरम्यान शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांनी त्यांची भेट घेत चर्चा देखील केली होती चर्चा काय झाली याची माहिती मिळू शकली नाही. मात्र आज आपल्या भक्त परिवारांसोबत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नासिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे त्याच जोरावर शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सात लोकसभा मतदारसंघात बाबाजींचा भक्त परिवार आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. आगामी सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराजांची उमेदवारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसू नये यासाठी शिंदे गट मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सात लोकसभा मतदारसंघात महायुतीला भक्त परिवाराचा थेट फायदा होऊ शकतो.त्या शक्यतेचा भाग म्हणून स्वामी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला असण्याची शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत जागा वाटपावरून वाद सुरू आहे त्याचबरोबर बंडखोरीची शक्यता लक्षात घेता व व वेळ कमी असल्याकारणाने रनिंग उमेदवार असलेल्या स्वामी शांतिगिरी महाराज यांना शिंदे गटातर्फे अधिकृत उमेदवार घोषित केले जाऊ शकते आता फक्त या उमेदवारी अर्ज सोबत एबी फॉर्म जोडला गेला की स्वामी शांतिगिरी महाराज हे महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार होण्याची शक्यता आहे .


![]()











