केली होती गुन्ह्याच्या पुराव्यांशी छेडछाड

नाशिक : बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जप्त केलेल्या मूळ हस्तलिखितात तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने फेरफार केल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पीआय अशोक उत्तमराव गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मार्च २०२५ मध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरणात दोन शिक्षण उपसंचालकांच्या फिर्यादीवरून दोन शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास बडेसाहेब नाईकवाडे या पोलिस निरीक्षकांकडे आहे. यादरम्यान नाशिकरोडचे ‘प्रभारी’ पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे होते. नाईकवाडे हे रजेवर असताना गिरी यांनी स्टेशन डायरीत कोणतीही नोंद किंवा लेखी आदेश देण्याऐवजी संबंधित गुन्ह्यात जप्त मूळ हस्तलिखित आवक-जावक रजिस्टर स्वत:च्या कक्षात मागवून घेतले. त्या रजिस्टरमधील पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने गिरी यांनी जावक नोंद घेत खोटे दस्तऐवज तयार केल्याचा गोपनीय अहवाल पोलिस आयुक्तालयास प्राप्त झाला. संबंधित गुन्ह्यातील तीन संशयितांच्या संगनमताने गिरी यांनी हा प्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. नेमके प्रकरण आहे तरी काय ? नाशिकरोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून २७ मार्च २०२५ रोजी नाशिकरोड पोलिसांत बनावट दस्तऐवजाप्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये लेखाधिकारी उदय पंचभाई व जळगाव येथील माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा हे संशयित आहेत. २१ डिसेंबर २०२३ ते २७ मार्च २०२५ पर्यंत हा घोटाळा झाला. जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांसह शाळांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांशी संगनमत करून संशयितांनी शालार्थ प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेख वापरून बनावट शालार्थ आयडी बनवून तो खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याची फिर्यादी करण्यात आली होती.

![]()












